BJP | “एक नवा मित्र आमच्यासोबत जोडला जाईल”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

BJP | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. त्यातच निवडणुकीच्या काळात भाजप नेत्यांकडून सत्यजीत यांना पाठिंबा देण्याची वक्तव्ये केली जात होती. त्यामुळे आता ही निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. यासंदर्भात बोलताना भाजपचे बडे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मोठं विधान केलं आहे. एक नवीन मित्र जोडला जाईल, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

आम्ही दोन जागा गमावल्या आहेत. एक नव्याने जागा मिळवली आहे. आणि एक नवीन मित्र नव्याने जोडलाय किंवा जोडला जाईल. पण या परिस्थितीत ज्या दोन जागा गेल्या त्याचं चिंतन केलं पाहिजे, असं माझं मत आहे. महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यांनंतर सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा अजूनच रंगल्या आहेत.

दरम्यान, नाशिकमध्ये आमच्यासोबत डॉ. सुधीर तांबे यांनी विश्वासघात केला. या मतावर आजही ठाम असल्याचं नाना पटोले (Nana Patole) म्हणालेत. आमचा तेथे विश्वासघात झालेला आहे. भाजपाने खेळी केलेली आहे. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे निवडून येणार असे भाजपाचे अनेक नेते, मंत्री म्हणत होते. हे भाजपाने नियोजनबद्धपणे केले होते, हे कोणालाही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी म्हंटल. त्याचबरोबर सत्यजीत तांबेंना पक्षात घ्यायचे की नाही, याचा निर्णय हायकमांडच घेईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

नाशिक पदवीधर मतदारसंघात आत्तापर्यंत काय घडलं?

नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर काँग्रेसकडून दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपने नाशिक पदवीधरच्या जागेसाठी उमेदवार दिला नाही. तसेच भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, पण त्यांना पक्षाकडून अधिकृत पाठिंबा मिळाला नाही.  त्यामुळे ही भाजपची खेळी असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु होती.

महत्वाच्या बातम्या :