Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढत असताना भारताच्या 4 जवानांना वीरमरण आले आहे. त्याच दिवशी देशामध्ये G-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर मोदींवर भाजप कार्यालयात पुष्पवृष्टी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.
देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत. जम्मू-कश्मीर हा तर संवेदनशील विषय आहे. तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतःवर फूल- पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत.
संसदेच्या विशेष सत्रात चर्चा जरा यावरही होऊ द्या. जम्मू- कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना आमचे अभिवादन! फुलांचे सडे सुकून जातील, तुमच्या रक्ताचे सडे देश सदैव स्मरणात ठेवील, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
Read Samana Editorial
पंतप्रधान मोदी यांच्यावर दिल्लीत जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली फुलांचा वर्षाव होत असताना मोदी भाजप कार्यकर्त्यांना सुहास्य वदनाने हात वगैरे उंचावून अभिवादन करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत मोदींवर फुलांचे सडे उधळले जात असताना जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आपल्या जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते.
लष्कर ए तोयबाचे अतिरेकी घुसले व जबानाची त्यांच्याशी चकमक झाली. त्यात भारतीय सैन्याच्या एका कर्नल आणि मेजरसह चार जांबाज अधिकारयांना हौतात्म्य प्राप्त झाले.
कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि डीएसपी हुमायून भट अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरगतीस प्राप्त झाले जम्मू कश्मीरमधील स्थिती बरी नाही व मोदी सरकार ‘जी 20’च्या यशाने हुरळून आणि विरघळून गेले आहे.
जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना केंद्रीय निवडणूक समितीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. मोदींनी ‘जी 20’चे जे अफाट यश संपादन केले, त्यामुळे त्यांच्यावर ‘धो-धो’ फुले उधळली गेली.
त्या वेळी तेथे गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. कर्नल, मेजर, डीएसपीच्या मृत्यूचे सावट या नेत्यांच्या चेहन्यावर नव्हते. निदान राजनाथ सिंह यांनी तरी ते दुख व्यक्त करण्याची कृती करायला हवी होती.
भाजपला अलीकडे सनातन धर्माबाबत पुतना मावशीचे प्रेम येत आहे. त्याच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, अनंतनागमधील चकमकीत तरुण पोलीस अधिकारी हुमायून भटने शौर्य गाजवून देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे, हे विसरता येणार नाही.
जम्मू कश्मीरातून 370 कलम हटवले असल्याने आता तिकडे सर्व आबादी आबाद होईल असे चित्र केंद्र सरकारने निर्माण केले, पण ते शेवटी खोटेच ठरले. 370 कलम हटवून साडेचार वर्षे झाली तरी तेथे विधानसभेच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत.
भारतीय जनता पक्षाचा तिथे दारुण पराभव होईल या भयाने निवडणुका होऊ न देणे हा जनतेशी द्रोह आहे. एका राज्यपालाच्या भरवशावर जम्मू कश्मीरसारखे संवेदनशील राज्य चालवता येणार नाही. कश्मीर खोऱ्यात हिंदू ‘पंडित’ समुदायाची घरवापसी होईल व खोरयात आता नवे उद्योगधंदे येतील व रोजगाराच्या संधी वाढतील असे मोदी-शहांतर्फे तेव्हा सांगितले.
त्यातले काहीएक प्रत्यक्षात घडलेले नाही. कश्मिरी पंडित आजही बेवारस अवस्थेत निर्वासित छावण्यांत जगत आहेत त्यामुळे 370 कलम हटवून, लडाखची भूमी वेगळी करून भाजप सरकारने काय साध्य केले? उलट लडाखमध्ये चिनी सैन्य पेन्गाँग लेकपर्यंत घुसले आहे व त्यांना मागे हटविण्यात सरकार कमजोर पडले हे मोदी सरकारचे अपयश आहे.
या सरकारला लडाखची भूमी परत मिळवता येत नाही, कश्मीरातील पंडितांचे संरक्षण करता येत नाही, अतिरेक्यांची घुसखोरी व जवानांची बलिदाने थांबवता येत नाहीत आणि कश्मिरी मनेही शांत करता येत नाहीत तरीही भारत सरकारच्या एका मंत्र्याने पाकव्याप्त कश्मीर मिळवण्याच्या हालचाली व कारवाया सुरू असल्याची डरकाळी फोडली. हे मंत्री माजी लष्करप्रमुख आहेत. या डरकाळीनंतर
‘टीआरएफ’ ही अतिरेकी संघटना जागी झाली व त्यांनी अनंतनागमध्ये घुसून चार जांबाज अधिकाऱ्यांचे बळी घेतले. मंत्र्याने डरकाळी फोडली, पण चार लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले.
पाकव्याप्त कश्मीर घेणार आहात हे चांगलेच आहे, पण अशा कारवाया भूमिगत पद्धतीने अत्यंत गुप्तपणे होत असतात. राजकीय डरकाळ्या फोडून नुकसान होते हे लष्कराचे प्रमुखपद भूषवलेल्या व्यक्तीला कळू नये याचे आश्चर्य वाटते.
सैन्यात आता राजकारण घुसवले आहे व सैनिकांनी रजा टाकून मोदींचा प्रचार करावा असे एक ‘फॅड’ सरकारने आणले आहे. मोदींचे सरकार नक्की काय करते आहे?
देशाला कोणत्या अंधारया गुहेत ढकलते आहे? 75 वर्षांच्या मेहनतीतून हा देश उभा राहिला. त्यात मोदी वगैरे लोकांचे अजिबात योगदान नाही. मोदींनी आता संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे व 75 वर्षांच्या कालखंडावर ते चर्चा घडवू इच्छितात.
त्यातून फसवणुकीची मागील नऊ वर्षे वगळायला हर्कत देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत. जम्मू कश्मीर हा तर संवेदनशील विषय आहे.
तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतवर फूल-पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत. संसदेच्या विशेष सत्रात चर्चा जरा यावरही होऊ द्या.
जम्मू कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना आमचे अभिवादन! फुलांचे सडे सुकून जातील, तुमच्या रक्ताचे सडे देश सदैव स्मरणात ठेवील!
सौजन्य – सामना
महत्त्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचे सडेतोड उत्तर
- Vijay Wadettiwar | ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | दिल्लीत मनोज जरांगेंच्या नावाची चर्चा; CM शिंदे म्हणतात…
- Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या कल्याणासाठी आमचं सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | व्हायरल व्हिडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…