Shivsena | शिंदे-ठाकरे गटाचा वाद सुरुच; आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरेंची न्यायालयात धाव

Shivsena | मुंबई : निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ‘शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी’, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

ठाकरे गटाची याचिका

ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली असली, तरी ती अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून दाखल करून घेण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. आजच्या लिस्टेड मेन्शनिंगमध्ये ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नव्हता. न्यायालयाने यासंदर्भात ठाकरे गटाला उद्या पुन्हा याचिकेसंदर्भात मेन्शनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर याचिका दाखल करून घ्यायची की नाही? याबाबत न्यायालय निर्णय घेईल, असेही सांगितले जात आहे. उद्या या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘आयोगाने आमदार, खासदारांच्या संख्येवरुन निर्णय दिला’

ठाकरे गटाच्या याचिकेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव हिरावून घेण्याचा घेतलेला निर्णय लोकशाही मार्गाने घेतलेला नाही. 2018ची पक्षाची कार्यकारिणी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे आहे. पक्षाचे बहुतांश सदस्य आमच्या बाजूने आहेत. निवडणूक आयोगाने केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे निर्णय दिला आहे. हा निर्णय योग्य नाही, असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.

‘देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच’

आजपर्यंत ज्या ज्या पक्षात वाद झालेत त्या पक्षांची निवडणूक चिन्हे गोठवण्यात आली. त्यानंतर ते चिन्ह इतर कोणत्याही गटाला देण्यात आलेलं नाही. या केसमध्ये मात्र चिन्ह दुसऱ्या गटाला देण्यात आलं आहे. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याचंही या याचिकेच्या माध्यमातून न्यायालयासमोर आणून दिले आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय

शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. त्यानंतर आयोगाने आपला निकाल राखून ठेवला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी आयोगाने निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या