Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी राज्य सरकार जनतेचा पैसा वायफळ खर्च करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. अशात या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मुक्काम शासकीय विश्रामगृहाऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये करणार होते.
या मुद्द्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं होतं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचतारांकित हॉटेल ऐवजी शासकीय विश्राम गृहमध्ये राहण्याचा निर्णय जाहीर केला.
या सर्व गोष्टीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, शरद पवार गटाने म्हटलं आहे.
The Mahayuti government came to power unconstitutionally
“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी.” “हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे…” म्हणत महायुतीचं सरकार असंवैधानिकरित्या सत्तेत आलं.
ट्रीपल इंजिन सरकार अधिक वेगाने सर्वसामान्यांसाठी काम करेल.असं म्हणू लागलं. परंतु हे ट्रीपल इंजिन सर्वसामान्यांच्या दारी न जाता स्वतःचाच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दिल्लीच्या दिशेने धावू लागलं आणि सर्वसामान्यांच्या आशा धुळीस मिळवल्या गेल्या.
इथला शेतकरी, कष्टकरी, असंघटीत कामगार, महिला व युवा या सर्वांच्या स्वप्नांवर कु-हाड चालवण्याचं काम महायुती सरकारने केलं. धार्मिक व जातीयवादाच्या विळख्यात अडकलेल्या महायुती सरकारने विकासकामांऐवजी सत्ताकारणालाच प्राधान्य दिलं.
परंतु आज महाराष्ट्रातील जनता आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवू लागली की, दंडुकेशाहीच्या आधारावर पोलिसांचं भय दाखवण्याचं काम राज्य सरकार करू लागल्याचं मराठवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवरून स्पष्ट झालं आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय मंत्रीमंडळ बैठक औरंगाबादमध्ये पार पडत आहे. परंतु ही बैठक ‘सर्वसामान्यांसाठी’ नसून स्वतःच्या मौजेसाठी आणि प्रसिध्दीसाठीच असल्याचे म्हणावे लागेल.
कष्टक-या महाराष्ट्राच्या घामातून उभे राहिलेले कररूपी पैसे खर्च करून राज्य सरकारने औरंगाबादमध्ये मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन केले. परंतु हे आयोजन, त्यातील घोषणा या आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठीच असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेले आहे.
मराठवाड्याच्या हिताचे निर्णय दोन दिवसीय मंत्रीमंडळ बैठकीत घेऊ तसेच मराठवाड्यातील जनता आमची आहे… असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना जर मराठवाड्यातील जनतेविषयी इतकाच कळवळा असता तर त्याच मराठवाड्यातील औरंगाबादला छावणीचं स्वरूप का आणलं गेलं ?
मराठवाड्यात होणा-या या दोन दिवसीय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर विविध मागण्यांसाठी एकूण १५ मोर्चे धडकणार आहेत. दोन दिवसाच्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी औरंगाबादमध्ये आयपीएस दर्जाचे ६ वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे २३ पोलीस अधिकारी, ११५ पोलीस निरीक्षक, २९६ पीएसआय, १७०० पोलीस, १४७ महिला पोलीस, एसआरपीएफच्या ४ तुकड्या, होमगार्ड ५०० असे एकूण ३ हजार पोलीस संपूर्ण शहरात तैनात आहेत.
इतकी मोठी पोलीस यंत्रणा नेमकी कशासाठी ? मोर्चाच्या ठिकाणी येणा-या १५ मोर्चांना महायुती सरकार घाबरतंय का ? मोर्चा काढणं हा ‘घटनात्मक’ अधिकार असताना ‘घटनाबाह्य’ सरकारला मात्र दंडुकेशाहीचा वापर करून मोर्चेक-यांवर दडपशाही करण्याचा अधिकार कुणी दिला ? राज्याच्या गृहमंत्र्यांची लाठीचार्ज संस्कृती त्यांना संपूर्ण मराठवाड्यात राबवायची आहे का ?
स्वतःचं अपयश लपवण्यासाठी गेल्या सरकारवर खोटेनाटे आरोप करण्याचं काम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री करत आहेत. गेल्या सरकारने केवळ घरूनच काम केल्याचं वक्तव्य या उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
परंतु ते विसलेत की, आपल्या विद्यमान सरकारमधील २९ मंत्र्यांपैकी १३ मंत्री हे गेल्याच सरकारमधील आहेत. आणि हो, त्यापैकी १ मुख्यमंत्री व १ उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याचा मांडीला मांडी लावून बसलेत, तर गेल्या सरकारमधील ५ आमदार आहेत. केवळ ९ मंत्री आणि १ उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्येच आहेत.
त्यामुळे ज्यांच्यावर आरोप केले जातायेत तेच आपल्यासोबत सत्तेत असून सत्तेचा उपभोग घेत आहेत, याची जाण या उपमुख्यमंत्र्यांनी तथा गृहमंत्र्यांनी ठेवावी. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुमच्या या दंडुकेशाहीला घाबरणारी नाही.
ज्या औरंगाबादमध्ये आहात त्या औरंगजेबाला घाम फोडणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगणारी महाराष्ट्राची जनता आहे, तुमच्या या दडपशाहीला महाराष्ट्रातील जनता कधीच बळी पडणार नाही”, असं शरद पवार गटानं (Sharad Pawar) ट्वीट करत म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Nana Patole | आताचं सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं – नाना पटोले
- Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला अन् गुजरात पुढे गेला – एकनाथ शिंदे
- Aditya Thackeray | मंत्रिमंडळाच्या बैठकीकडून काहीही अपेक्षा नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत
- Jayant Patil | मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप – जयंत पाटील