Sanju Samson: अहमदाबादच्या ऐतिहासिक मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या संजू सॅमसनने विश्वविजेतेपदानंतर एक असा खुलासा केला आहे, ज्याने सर्वच क्रिकेटप्रेमींना भावूक केले आहे. फायनलमध्ये ८९ धावांची वादळी खेळी करणाऱ्या संजूने या यशाचे श्रेय चक्क ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरला दिले आहे.
सामन्यानंतरच्या मुलाखतीत बोलताना संजू म्हणाला, “या मोठ्या फायनलपूर्वी माझे सचिन सरांशी बोलणे झाले होते. त्यांनी मला मैदानावर जाऊन फक्त खेळाचा आनंद घेण्यास सांगितले होते. त्यांच्या त्या एका सल्ल्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मी आज ही खेळी करू शकलो.” संजूने पुढे असेही सांगितले की, हा विजय आणि विश्वचषकाची ट्रॉफी त्याच्यासाठी सचिन सरांच्या मार्गदर्शनाचे फळ आहे.
संजूने आज केवळ ८९ धावाच केल्या नाहीत, तर त्याने भारतीय डावाचा पाया रचला ज्यामुळे भारताने २५५ धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडचा संघ जेव्हा १५९ धावांवर बाद झाला आणि भारताने ९६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला, तेव्हा संजूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
सचिन तेंडुलकरनेही या विजयानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. संजू सॅमसनचे हे ‘सचिन कनेक्शन’ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, एका गुरुने आपल्या शिष्याला दिलेला मंत्र भारताला विश्वविजेता बनवून गेला, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








