कोल्हापूर/सांगली: माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. हा महामार्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी विनाशकारी असल्याचा आरोप करत, शेट्टींनी येथील कारखानदार आणि लोकप्रतिनिधींना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या महामार्गाच्या कामात ५० हजार कोटींचा घोटाळा होण्याची शक्यता वर्तवत, गप्प बसल्यास लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा ठपका ठेवला जाईल, असा थेट इशारा त्यांनी ( Raju Shetti ) दिला आहे.
शेट्टी यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली. उद्या, मंगळवार, १ जुलै रोजी शिरोलीतील पंचगंगा नदीच्या पुलावर आंदोलनासाठी जमण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ते म्हणाले की, “नदी प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची गती मंदावली आहे. पंचगंगा, दूधगंगा, वेणगंगा, वारणा आणि कृष्णा या नद्यांच्या पात्रांमध्ये गाळ आणि वाळू साचली असून, नदीपात्र सपाट होत चालले आहे.”
Raju Shetti Warns on Shaktipeeth Highway ‘Scam’
याचबरोबर, शक्तीपीठ महामार्गामुळे कर्नाळ ते गारगोटी या ८५ किलोमीटरच्या परिसरात तब्बल ३५ ते ४० किलोमीटर लांबीचा भराव पडणार असल्याने नदीच्या पाण्याला आणखी अडथळा निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ६० हजार एकर जमीन क्षारपट झाली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे पुढील आठ-दहा वर्षांमध्ये ही आकडेवारी एक लाख एकरवर पोहोचेल आणि शेतीचे प्रचंड नुकसान होईल,” असे गंभीर आरोप शेट्टींनी केले.
शेट्टी यांनी कारखानदारांनाही याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. “गेल्या वर्षी केवळ ८६ दिवस साखर कारखाने चालले. शक्तीपीठ महामार्गामुळे १५ ते २० टक्के जमिनीचे नुकसान झाल्यास ऊस उत्पादन कमी होईल आणि कारखाने चालण्याचे दिवस आणखी घटतील,” असे ते म्हणाले. हा मार्ग अव्यवहार्य असून, यात मोठा भ्रष्टाचार होणार असल्याचा त्यांचा( Raju Shetti ) दावा आहे.
“केवळ सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास, गरिबांवर, शेतकऱ्यांवर आणि येथील उद्योगधंद्यांवर आक्रमण करणारा, इथल्या लोकांना उद्ध्वस्त करणारा हा रस्ता आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. येथील कारखानदारांनी देखील सरकारला विरोध केला पाहिजे. कारखानदारांनी सरकारला घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या मिशीला कुठं खरकटं लागलं नसेल तर विरोध करा,” अशा शब्दांत त्यांनी कारखानदारांना आव्हान दिले.
स्थानिक लोकप्रतिनिधींनाही शेट्टींनी खडसावले. “तुम्ही यापूर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवणारी पत्रे दिली आहेत, पण आता तुम्ही गप्प बसलात तर या रस्त्याच्या कामात होणाऱ्या ५० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात तुमचाही हिस्सा आहे, असं जनतेला वाटेल. तुमच्या हेतूंबद्दल जनतेच्या मनात संशय निर्माण होईल,” असा थेट इशारा त्यांनी ( Raju Shetti ) दिला.
शेतकरी दिनानिमित्त, मंगळवारी (१ जुलै) सकाळी ११ वाजता पुणे-बंगळूर महामार्गावरील पंचगंगा पूल, शिरोली या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या महामार्गाचा विरोध करूया, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईत अवजड वाहतूकदारांचा बेमुदत संप; शालेय बसेस, कंटेनर वाहतूक ठप्प, वारकरीही अडचणीत
- नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “विजयी मेळावा म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे?”
- लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, तहात हरायचं नाही; हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












