Share

मुलगी झाल्याचा राग आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा; सासरच्यांनी विवाहितेला दोन चिमुकल्यांसह हाकलले घराबाहेर

सलग दोन मुली झाल्याच्या रागातून आणि पैशांच्या तगाद्यातून गळनिंब येथील एका विवाहितेला दोन चिमुकल्यांसह घराबाहेर काढण्यात आले. सासरच्यांविरोधात बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल.

Published On: 

Woman Harassed | woman and two daughters thrown out of house over dowry and giving birth to girls in Gangapur Chhatrapati Sambhajinagar

किरण काळे पाटील, पैठण – समाजात कितीही प्रगती झाली असली, तरी आजही मुलीच्या जन्मावरून सुनेचा छळ करणाऱ्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गळनिंबमध्ये असाच एक संतापजनक प्रकार (Woman Harassed) उघडकीस आला आहे. सलग दोन मुली झाल्याचा राग आणि घर बांधण्यासाठी माहेराहून आणलेले पैसे परत मागितल्याने एका २५ वर्षीय विवाहितेला तिच्या दोन चिमुकल्या मुलींसह थेट घराबाहेर काढण्यात आलं आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी पती, सासू आणि नणंदेवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून, गळनिंब येथील आप्पासाहेब शिरवत याच्यासोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये तिचं लग्न झालं होतं. सुरुवातीची काही वर्षे सासरच्यांनी तिला चांगलं नांदवलं. पण नंतर मुलबाळ होत नसल्याने टोमणे मारण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये पहिल्या मुलीचा जन्म झाला, त्यानंतर काही काळ सर्व सुरळीत होतं. मात्र जुलै २०२४ पासून सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत पुन्हा मारहाण आणि शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली.

‘दोन लाख घेऊन ये नाहीतर…’ पैशांसाठी सुरू झाला जाच; सासू आणि नणंदेचाही छळ

याचदरम्यान पती आप्पासाहेब आणि सासू यमुना यांनी घर बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. विवाहितेने आपले वडील ज्ञानेश्वर लक्ष्मण दाभाडे यांना ही अडचण सांगितल्यानंतर, त्यांनी जावयाला दोन लाख रुपये दिलेही. पण काही महिन्यांनंतर वडिलांना पैशांची गरज असल्याने कल्याणीने पतीकडे ते पैसे परत देण्याची मागणी केली. याच रागातून पतीने तिला बेदम मारहाण केली. दुसरीकडे, विवाहितेची नणंद सविता आडकिते हिनेही ‘हे माझ्या भावाचं घर आहे, तू इथून चालती हो’ असं म्हणत वारंवार अपमान करण्यास सुरुवात केली.

त्यातच एप्रिल २०२५ मध्ये कल्याणीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ‘आम्हाला मुलगा पाहिजे होता,’ असं म्हणत मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्यांचा जाच आणखी वाढला. जुलै २०२६ मध्ये सासूने घरात सापडलेला एक जुना, खराब मोबाईल (ज्यात सिमकार्डही नव्हते) दाखवत ‘तू यावर कोणाशी तरी बोलतेस’ असा खोटा आळ घेतला आणि कल्याणीला पुन्हा मारहाण केली. यानंतर पतीने तिला दोन्ही चिमुकल्यांसह तिच्या माहेरी (धुपखेडा, ता. पैठण) नेऊन सोडले. महिला तक्रार केंद्राने नोटीस पाठवूनही सासरचे लोक हजर राहिले नाहीत आणि त्यांनी तिला नांदवण्यास नकार दिला.

अखेर कल्याणीने दिलेल्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पती, सासू आणि नणंदेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS 2023) कलम ८५, ११५(२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके यांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार संदीप धनेधर करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही