किरण काळे पाटील, पैठण – MSEDCL: राज्याच्या ग्रामीण भागात वीज चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला जीवघेण्या हल्ल्यांना सामोरं जावं लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, ‘तुम्हीच वीज चोर आहात’ असा आरोप करत दोन सख्ख्या भावांनी अधिकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.
पैठणजवळील तुळजापूर गावात गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीज चोरी रोखणे आणि थकीत बिलांची वसुली करण्यासाठी महावितरणचे अंगद सुखदेव वनवे (वय ३२, उपविभाग पैठण, आपेगाव शाखा)आणि त्यांच्या ९ सहकाऱ्यांचे (दिलीप झांजे, सचिन बुरकुले, संभाजी गिरगे, अश्विनी जाधव, गणेश नाटकर, ईश्वर सोनवणे, गौरव गिरगे, नवनीत शिंदे, सचिनसिंग चव्हाण) पथक गावात गेले होते. त्यावेळी भागवत सोनवणे याने सुरुवातीलाच पथकातील महिला वरिष्ठ तंत्रज्ञ अश्विनी जाधव यांना अडवले आणि ‘तुमचं नेमकं काय काम चालू आहे?’ असा जाब विचारत हुज्जत घालायला सुरुवात केली.
‘घरी चल चहा पाजतो’ म्हणताच राडा; कॉलर पकडून पाठीत घातली लाथ
महिला कर्मचाऱ्यासोबत वाद सुरू असल्याचे पाहून अंगद वनवे पुढे आले. त्यांनी कारवाईची माहिती देताच भागवतने ‘तुम्ही सगळे वायरमनच वीज चोर आहात’ असा थेट आरोप केला. वाद वाढू नये म्हणून वनवे यांनी त्याला शांत करत, ‘दादा तू आमच्या घरी चल, मी तुला चहा पाजून आमच्या घरात वीज चोरी आहे का दाखवतो,’ असं समजावण्याचा प्रयत्न केला.
पण याच वाक्याचा राग धरून, ‘तू मला अरे-तुरे कसं काय करतोस?’ म्हणत भागवतने वनवे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पाठीमागून लाथ मारत वनवे यांची कॉलर (गजंडी) पकडली आणि थेट छातीत बुक्क्या मारून त्यांच्या अंगावर मोठा दगड उचलला. सुदैवाने त्यांचे सहकारी गणेश नाटकर यांनी तो दगड मध्येच पकडला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या झटापटीत नाटकर यांच्या हाताला दुखापत झाली.
दुसरीकडे, याच गोंधळात भागवतचा लहान भाऊ महेश तिथे आला आणि त्यानेही काहीही न विचारता कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू केली. इतर सहकाऱ्यांनी कशीबशी मध्यस्थी करून त्यांना सोडवले. ‘पुन्हा गावात कारवाईसाठी आलात तर एक-एकाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत या दोन्ही भावांनी महावितरणच्या गाडीच्या दिशेने दगडफेकही केली. या धक्कादायक प्रकारानंतर भागवत आणि महेश सोनवणे या दोघांवर पैठण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS 2023) कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल केले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पैठण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (निरीक्षक) महादेव गोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र जिवाडे हे करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- जेवणाचे १० हजार बिल मागितले म्हणून राडा, मालकाला रक्तबंबाळ करून कामगारांच्या अंगावर घातली कार
- ७२ वर्षांची परंपरा मोडली; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’समोर होणार गौरव
- मनोज जरांगेंच्या भेटीला आता सरकारचं शिष्टमंडळ जाणार नाही; विखे पाटलांचा मराठा आरक्षणावर मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











