ठाणे, 25 ऑक्टोबर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी (Pradeep Purnekar) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सत्तेचा खेळ कायम चालत असतो, त्यामुळे सत्तेची एवढी मस्ती आणि उन्मत्तता बरी नाही. सत्तेत नसाल तेव्हा याचे काय पडसाद उमटतील याचा विचार करा, असा थेट इशारा त्यांनी दिला. ठाण्यातील मानपाडा येथे पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ठाणे पोलिसांनी स्थापन केलेली एसआयटी (SIT) केवळ एक नाटक आणि सोयीची व्यवस्था असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे. पोलिसांचा तपास संथ नाही तर असून नसल्यासारखा आहे. पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांना सोडून केवळ भाडोत्री मारेकऱ्यांना अटक केली आहे. पूर्णेकर यांच्या पत्नी आणि मुलाच्या जबाबाकडे दुर्लक्ष केले जात असून, एफआयआरच्या प्रक्रियेपासूनच सर्व चुकले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. विशेष म्हणजे, एसआयटीचा प्रमुख आयपीएस अधिकारी असण्याची परंपरा असताना सध्याच्या एसआयटीचा प्रमुख आयपीएस नाही, त्यामुळे ही तपास यंत्रणा बोगस असून ती मुख्य कट रचणाऱ्यांना वाचवण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.
पूर्णेकर यांच्यासारख्या एका मदत करणाऱ्या समाजसेवकाची भरवस्तीत घराजवळ अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जनावरालाही मारणार नाहीत अशा क्रूर पद्धतीने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असले तरी, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ‘खलसंरक्षणार्थ’ काम सुरू असल्याची घणाघाती टीका सपकाळ यांनी केली. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या वर्तनाचा धिक्कार केला.
नगरसेवक पदाच्या वादातून ही हत्या झाली, हे कारण पटण्यासारखे नसून ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याच्या अँगलने तपास व्हावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. यासाठी राज्य गृहविभागाने ठाणे जिल्ह्याबाहेरील एका सक्षम आणि पारदर्शक आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात स्वतंत्र एसआयटी नेमावी. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, असे ते म्हणाले. या मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष सोमवारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र देणार आहे. राज्याच्या मंत्रालयात सध्या तीन पक्ष टोळीयुद्धासारखे भांडत असून, कुटुंबासारखे वातावरण असणाऱ्या ठाण्यातही आता टोळीयुद्ध सुरू झाल्याचे सांगत काँग्रेस व महाविकास आघाडी पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
- या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
- ‘त्या छोट्या चुकांमुळे आम्हाला फटका बसला’; सलग दुसऱ्या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरची खंत
Quick Answers
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ठाणे पोलिसांनी स्थापन केलेली एसआयटी केवळ एक नाटक आणि सोयीची व्यवस्था असल्याचे सांगत, ती बोगस असून मुख्य कट रचणाऱ्यांना वाचवण्यासाठी असल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.
राज्य गृहविभागाने ठाणे जिल्ह्याबाहेरील एका सक्षम आणि पारदर्शक आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात स्वतंत्र एसआयटी नेमावी, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








