छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आता चांगलाच तापल्याचं चित्र आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सलग १२ वा दिवस असून, त्यांनी एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख केल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात तीव्र नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडत, जरांगेंना सूचक इशारा दिला आहे.
सरकारने जरांगे पाटील यांच्या १२ मागण्या मान्य केल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. पण सरकारने एकही मागणी पूर्ण केली नसल्याचा दावा करत जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यामुळेच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
Uday Samant on Manoj Jarange Patil protest
मराठा आरक्षण: ‘जसे तुमचे समर्थक तसे आमचेही…’ ते ही बोलणार ना!
जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी खदखद बोलून दाखवली. “जसे मनोज दादांचे फॉलोअर्स आहेत, तसेच आमचेही नेते आहेत आणि त्यांचेही समर्थक आहेत. ज्या नेत्यांनी मराठा समाजासाठी एवढं काम केलं, त्यांच्याबद्दल असं बोलल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना नक्कीच दुखावतात,” असं म्हणत सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मराठवाड्यात आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्राच्या २१ हजार ५१ दाखल्यांची पडताळणी झाली असून, त्यातील तब्बल १६ हजार ११० दाखले वाटण्यात आले आहेत. तर केवळ २ हजार दाखले प्रलंबित असून तेही लवकरच दिले जातील, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेचा ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगत सरकारने मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे, सणासुदीच्या काळाचा संदर्भ देत सामंत यांनी आंदोलनाला स्थगिती देण्याचं आवाहन केलं आहे. उद्या पोळा आहे, त्यानंतर राज्यात गणेशोत्सवाची धूम असेल आणि मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीही आहे. अशा परिस्थितीत दंगल घडवणे हा आमच्या शब्दकोशातच नाही, असं सांगत जरांगेंनी सरकारवरचे गैरसमज डोक्यातून काढून टाकावेत, अशी विनंती सामंत यांनी केली. आम्ही त्यांना अभ्यासक पाठवण्याचं आवाहन केलं होतं, पण ते आलेच नाहीत तर आम्ही काय करायचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सलग १२ दिवस उपोषण सुरू असल्याने जरांगे यांची चिडचिड होत असावी, हे आम्ही समजून घेतो. पण जाणीवपूर्वक कोणीतरी त्यांच्या मनात गैरसमज पसरवत असल्याचा थेट संशयही सामंत यांनी व्यक्त केला. जरांगेंच्या आक्रमक भाषेला आता सरकारमधील नेतेही त्यांच्याच भाषेत जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय’
- मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि अंतरवाली सराटीत दोन दिवस दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- मुलगी झाल्याचा राग आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा; सासरच्यांनी विवाहितेला दोन चिमुकल्यांसह हाकलले घराबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











