Radhakrishna Vikhe Patil | “घरोबा एकाबरोबर अन् संसार…”; विखे-पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक निर्णय म्हणून काल रात्री पाठिंबा दिला खरा पण आता तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. ‘तांबे यांचा विजय निश्चित असून त्यांनी आता भाजपमध्ये यावे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत,’ असे विखे पाटील म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उघडपणे पाठिंबा दिला जात नाही, अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

“महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एक टोळी आहे. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे”, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “मविआ कुठल्याही विचारसरणीवर, विचारधारेवर किंवा तत्त्वावर एकत्र आलीच नव्हती. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन निवडून आली. नंतर ते महाविकास आघाडीसोबत गेले. त्यामुळे ते टिकले नाहीत.”

त्याचबरोबर “काँग्रेसचा अधिकृत उमेदवार या निवडणुकीत राहिला नाही. काँग्रेसचे सोकॉल्ड नेते घरात बसून आहेत आणि काँग्रेस नेतृत्व त्यांच्यावर कारवाईसुद्धा करत नाही”, अशी टीका विखे पाटलांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल केली आहे.

महत्वाच्या बातम्या :