मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भय्यूजी जोशी यांच्या विधानावर व्यक्त केलेल्या मतावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली होती. विशेष म्हणजे, त्यांनी राज ठाकरे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा उल्लेख करत विचारले होते की, “तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकतात?” या वाक्यावरून आता मनसेच्या प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सदावर्तेंवर जोरदार पलटवार केला आहे.
महाजन यांनी सदावर्तेंच्या वक्तव्याला अयोग्य ठरवले असून, त्यांनी सदावर्ते ॲट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणामुळे असे वागत असल्याचा आरोप केला. तसेच, “त्यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली आहे,” असा शब्दप्रयोग करत त्यांच्यावर कडवट टीका केली.
Gunaratna Sadavarte criticized MNS chief Raj Thackeray
महाजन म्हणाले की, सदावर्ते यांचा शब्दप्रयोग असभ्य असून, जर त्यांना ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण नसते, तर त्यांना योग्य प्रत्युत्तर मिळाले असते. त्यांनी सदावर्ते यांची मानसिकता प्रश्नांकित करत, बीडमधील एका हत्याकांडातील मुख्य आरोपीला ‘साहेब’ म्हणत सन्मान देणाऱ्या सदावर्तेंची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी केली. त्याचबरोबर, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल सदावर्ते यांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही महाजन यांनी केली.
भय्यूजी जोशी म्हणाले होते की, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकण्याची गरज नाही, तसेच घाटकोपरची भाषा गुजराती आहे. सदावर्ते यांनी या विधानाला पाठिंबा देत राज ठाकरेंवर टीका केली आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केला.
सदावर्ते यांनी म्हटले होते की, “राज ठाकरे, तुमची मुलं कॉन्व्हेंट आणि आयबीडीपीमध्ये शिकतात, पण तुम्ही इतरांना मराठी शिकण्याचा सल्ला देता. हे कसे योग्य?” तसेच, त्यांनी हेही सांगितले की भय्यूजी जोशी यांच्या विधानात संविधानाच्या दृष्टीने काही चुकीचे नाही. या साऱ्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, मनसे आणि सदावर्ते यांच्यात शाब्दिक युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे.