Anil Parab Vs Nitesh Rane । विधानपरिषदेत शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी छळ सहन करावा लागला, तसेच मला पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आणि जोरदार विरोध केला.
नितेश राणे यांनी परब यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील कारभारावर हल्ला चढवताना, परब यांनी लोकांची घरे पाडली, कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि केंद्रीय मंत्र्याला अटक केली, असा आरोप केला. एवढेच नाही, तर त्यांनी अनिल परब यांना “मातोश्रीच्या फरशी चाटावी लागली आणि घराबाहेर झोपावे लागले,” असे सुनावले.
राणेंच्या या टीकेला परब यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले. त्यांनी राणे कुटुंबावर खुनाचे आरोप असल्याचे नमूद करत, “अशा लोकांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. तसेच, “राणे कुटुंब मातोश्रीच्या चाटुकारितेमुळे मोठे झाले आहे,” असेही परब यांनी टोला लगावला. सभागृहात काही सदस्य असंसदीय भाषा वापरत असल्याने त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.
सभागृहातील वातावरण अधिक तापल्यानंतर सभापतींनी असंसदीय शब्द वगळण्याचे निर्देश दिले आणि वादग्रस्त विधाने तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. परब यांनी आपले वक्तव्य पुन्हा स्पष्ट करत “संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत, मी काही चुकीचे बोललो असेल तर कारवाईला तयार आहे,” असे सांगितले.
त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत, “सभागृहातील सदस्य श्रीकांत भारतीय यांनी आपल्या कुत्र्याचे नाव ‘शंभू’ ठेवले आहे आणि याचा पुरावा माझ्याकडे ट्विटर पोस्टच्या स्वरूपात आहे,” असे सांगून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. या वादामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले, आणि सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाकयुद्ध पेटल्याचे चित्र निर्माण झाले.
महत्वाच्या बातम्या