बुलढाणा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री आणि कंगना रणौत यांनी केलेल्या “मोदी हे देवाचा अवतार आहेत” या विधानावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मोदी हे देवाचा अवतार नाहीत, ते माणसाचेच अवतार आहेत.”
कंगना रणौत यांनी नरेंद्र मोदी यांचे वर्णन ‘अवतारी पुरुष’ असे करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. यावर उत्तर देताना आठवले म्हणाले, “मोदी हे जगभरात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला ८० टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ते मजबूत आणि प्रभावी पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांना देवाचा अवतार म्हणणे मला योग्य वाटत नाही.”
Narendra Modi Is Not a Divine Incarnation – Ramdas Athawale
मोदी २०२९ मध्येही पंतप्रधान होतील – आठवले
राजकीय परिस्थितीवर भाष्य करत आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “विरोधकांकडे केवळ आरोप-प्रत्यारोप करण्याचेच काम उरले आहे. मोदी यांचे वय झाले असले तरी ते अजूनही ऊर्जा आणि कणखरतेने कार्यरत आहेत. मला खात्री आहे की २०२९ मध्येही मोदीच पंतप्रधान होतील,” असे ते म्हणाले.
मराठीवर ठाम, पण मनसेच्या दादागिरीला विरोध
राज ठाकरे यांच्या ‘मराठी भाषा सक्ती’ मोहिमेवर देखील आठवले यांनी मत व्यक्त केले. “मराठीचा सन्मान आवश्यक आहे आणि ती भूमिका योग्य आहे. मात्र, दादागिरीच्या मार्गाने ती भाषा लादणे योग्य नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, येथे सर्व राज्यांतील लोक राहतात. त्यामुळे सर्व फलक केवळ मराठीत असतील, तर परदेशी पर्यटक व इतर लोकांना अडचण येऊ शकते. मराठीसह इंग्रजी फलकही आवश्यक आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे आठवले म्हणाले, “लोकसभेत राज ठाकरे आमच्यासोबत होते, पण त्याचा फारसा राजकीय फायदा झाला नाही. विधानसभेत मात्र ते आमच्यासोबत नव्हते.” तसेच बँक व्यवहार मराठीतून करण्याच्या भूमिकेलाही त्यांनी विरोध दर्शवला.
महत्वाच्या बातम्या