Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य

Nana Patole | मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा (Maharashtra Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. हा वाद आता टोकाला पोहचला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. थोरातांनी राजीनामा दिल्याच्या चर्चेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

“आमच्याकडे त्यांचा राजीनामा आला नाही” (We have not received his resignation)

“बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याबाबत मला काहीही माहिती नसून अद्याप आमच्याकडे त्यांचा राजीनामा आला नाही. बाळासाहेब थोरातांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देणारं ट्वीट सकाळी केलं आहे”, असंही नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

“माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”- Nana Patole

“नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने बरंच राजकारण शिकायला मिळालं. माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला काँग्रेसच्या विचारसरणीला पुढे नेऊन निवडणुकांमध्ये विजयी करायचं आहे. ते काम मी करत आहे. कोण काय राजकारण करत आहे त्यात मला पडायचं नाही. मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे. मला या सगळ्या राजकारणात पडायचं नाहीये. मी सरळ मार्गाने या राजकारणात आलो आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“असलं घाणेरडं राजकारण कधीच करणार नाही”

“मला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीदरम्यान राजकारणातल्या खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या नव्हत्या, त्या मला शिकायला मिळाल्या. पण मी या प्रकारचं घाणेरडं राजकारण कधीच नाही करणार”, अशी सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी यावेळी केलं आहे.

“त्यांचा गैरसमज झाला असेल” (Nana Patole Talk about Balasaheb Thorat)

“काल अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे माझ्यासह काँग्रेस उमेदवाराचा फॉर्म भरायला होते. आता कोणत्या गटबाजीची चर्चा चालू आहे हे मला माहिती नाही. बाळासाहेब थोरातांची प्रकृती ठीक नाही. बाळासाहेब थोरात आमचे विधिमंडळ पक्षनेता आहेत. मी स्वत: आमदार आहे. त्यांचा काही गैरसमज झाला असेल, तर त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आम्हाला काहीच अडचण नाही. त्यासाठी 15 तारखेला कार्यकारिणीची बैठक आम्ही बोलावली आहे. येत्या निवडणुकांमध्ये आमच्या आमदारांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. आगामी निवडणुकांची त्यात चर्चा होणार आहे”, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

नेमका काय वाद आहे?

सत्यजीत तांबे यांची उमेदवारी आणि त्याअनुषंगाने पक्षात झालेल्या राजकारणावर बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यांनी पक्षातील काही वरीष्ठ नेतेमंडळींशी चर्चा करून ‘नाना पटोलेंसोबत काम करणं आता अवघड झालंय’, असं थोरातांनी सांगितल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी बाळासाहेब थोरातांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. थोरातांनी थेट हायकमांडला राजीनामा पाठवला असून अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही, असंही सांगितलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-