Nana Patole | “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Nana Patole | नागपूर : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. येत्या काही दिवसांत निकालही जाहीर होईल. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

“शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”

“हे सरकार जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून होईल. मागील अनेक महिन्यांपासून न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. मात्र निकालाला एवढा उशीर लावणे हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. परिशिष्ट 10 नुसार लवकर निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“हे सरकार घटनाबाह्य” (Nana Patole Criticize state Government)

“घटनेचा परिशिष्ट 10 एकदम स्पष्ट आहे. या सुनावणीवरून हे लक्षात येते की बदमाशी शिकायची असेल, तर या खोके वाल्यांकडून शिकायला पाहिजे. या प्रकरणी दोन आमदारांनी ईमेलद्वारे अविश्वासाची नोटीस दिली होती. मात्र नियमाप्रमाणे याची एक वेगळी प्रक्रिया आहे. घटनापीठ पाच न्यायाधीशांचे असो किंवा सात न्यायाधीशांचे मात्र निकाल लवकर लागला पाहिजे. कारण मुळातच हे सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळे जास्त दिवस हे सरकार सत्तेत राहिल्यास अनेक निर्णय चुकीचे होतील”, अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

आणखी काय म्हणाले नाना पटोले? 

“काँग्रेसमध्ये कोणलेही मतभेद नाही. कालच्या बैठकीत सर्व नेते उपस्थित होते. सर्वांनी आपापली भूमिका स्पष्टपणे मांडली. पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असा निर्णय कालच्या बैठकीत झाला”, असे नाना पटोलेंनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-