Devendra Fadnavis | “म्हणजे उद्धव ठाकरे पण चोरमंडळाचे सदस्य”; राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ‘विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे’, असं धक्कादायक वक्तव्य केलं होते. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis reaction On Sanjay Raut’s Statement

“विधिमंडळाला चोर म्हणणं हे सहन करण्यासारखं नाही. या विधानमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक मोठे नेते या सभागृहाने बघितले आहेत. आपल्या राज्याचं विधानमंडळ हे देशातील सर्वोत्कृष्ट असं विधानमंडळ आहे. या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला दिला, तर जनतेचा या सभागृहावर विश्वास राहणार नाही. त्यामुळे राऊतांच्या विधानाचं समर्थन करता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“मग उद्धव ठाकरे पण चोरमंडळाचे सदस्य”

“हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही. विधिमंडळ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सभागृहाचे सदस्य आहे. मग तेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात. आम्ही सर्वच चोर मंडळाचे सदस्य ठरतो. राऊतांनी केवळ चोरमंडळ नाही, तर गुंडमंडळ असा शब्दही वापरला आहे. आम्ही काय गुंड आहोत का?” असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.

“…तर उद्या 100 राऊत तयार होऊन विधीमंडळाला ‘चोर’ म्हणतील”

“संजय राऊत हे साधे नेते नाहीत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. अशा मोठ्या सभागृहाचे सदस्य जर अशा प्रकारे बोलत असतील, तर आपण कसं सहन करायचं? त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला नाही, उद्या 100 राऊत तयार होऊन या विधानमंडळाला रोज चोर म्हणतील”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काय होतं संजय राऊतांचं वक्तव्य?

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘विधिमंडळ नाही, चोरमंडळ’ असा शब्द प्रयोग केला आहे. “ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.