Ajit Pawar | संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ; अजित पवारांचं शेलारांना समर्थन

Ajit Pawar | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार आशिष  शेलार यांनी देखील राऊतांवर ताशेरे ओढले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आशिष शेलारांचं समर्थन केल्याचं पहायाला मिळालं आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

“संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर महाराष्ट्र द्रोह केला आहे. उद्या कुणीही सभागृहातील सदस्यांना काहीही म्हणेल. त्यामुळे आताच जरब बसणे आवश्यक आहे”, असं आशिष शेलार म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेलार यांचं समर्थन केलं. तर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचं दिसून आलं आहे.

अजित पवारांचे शेलारांना समर्थन

‘संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या पासून फारकत घेतली आहे. या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

‘बोटचेपी भूमिका घेऊ नका. विधिमंडळाच्या अपमानाबाबत अशी भूमिका घेऊ नका’, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं. शेलार यांच्या या भूमिकेचं अजित पवार यांनी समर्थन केलं. मात्र, “कारवाई करण्यापूर्वी नेमकं त्यांनी असं वक्तव्य केलं आहे का ते तपासून पाहिलं पाहिजे”, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

“पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे”

“आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या. कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर एक बातमी आली आहे. एका व्यक्तीने विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं. शेलार यांच्या मताशी सहमत आहे. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“..पण शहानिशा केली पाहिजे” (Ajit Pawar said should be checked)

“संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला. पण काहीही बोलणं योग्य नाही. जे बोलले ते खरोखरच बोलले आहे का? त्यात तथ्य आहे का? जे बोलले त्यांची बाजू घेत नाही. पण शहानिशा केली पाहिजे. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता कामा नये. पण ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘विधिमंडळ नाही, चोरमंडळ’ असा शब्द प्रयोग केला आहे. “ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.