ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला ( David Warner ) इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2025 ) लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही, यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला. आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा वॉर्नर सोशल मीडियावरही त्याच्या रिल्समुळे चर्चेत असतो. विशेषतः भारतीय गाण्यांवर त्याने केलेल्या डान्स स्टेप्समुळे तो भारतीय चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकला आहे.
David Warner मोठ्या पडद्यावर पदार्पण
IPL लिलावात संघ न मिळाल्याने चाहत्यांची निराशा झाली असली, तरी वॉर्नरच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. तो आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार असून, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील मिथ्री मूव्ही मेकर्स त्यांच्या आगामी ‘रॉबिनहुड’ या चित्रपटात त्याला लॉन्च करण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटात तो नितीन आणि श्रीलीला यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) अनेक वर्षे सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला असून, संघाचा कर्णधारही राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सने IPL चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यामुळे दक्षिण भारतात त्याला मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
‘Robinhood’ चित्रपट आणि रिलीज डेट
दिग्दर्शक वेंकी कुडुमुला यांच्या ‘रॉबिनहुड’ चित्रपटाची सुरुवातीला 25 डिसेंबर 2024 रोजी रिलीज करण्याची योजना होती. मात्र, ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली. आता 28 मार्च 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याच आठवड्यात सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट 30 मार्चला रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आता क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकार ठोकणारा वॉर्नर सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर किती प्रभाव पाडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
महत्वाच्या बातम्या