Sadabhau Khot | “..पण महात्मा गांधींच्या विचारांचा खून पंडित नेहरुंनी केला”; सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य

Sadabhau Khot | पुणे : महात्मा गांधी यांच्या हत्येवरुन राज्यात आणि देशातही अनेकदा वक्तवे करण्यात आली आहेत. अनेकांनी महात्मा गांधी यांच्यावर टीकाही केली. मात्र आता राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेड्यांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला”, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

“महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे. पण महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून पंडित नेहरु यांनी केला हे स्वीकारावेच लागेल”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदाभाऊ खोत हे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे संस्थेच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

महात्मा गांधींनी सांगितले, ‘खेड्याकडे चला आणि खेडी समृद्ध करा’. तर नेहरुंनी सांगितलं, ‘खेडी लुटा आणि शहरं समृद्ध करा. खेडी उद्धवस्त झाली पाहिजेत’ म्हणून आज संपत्ती निर्माण करणारी माणसं आज एका बाजूला आत्महत्या करत आहेत. ही शोकांतिका आहे” असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून देशाचा विकास केला, मात्र, इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे”, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या