दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली NEET परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत आंदोलन सुरू आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यामुळे राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
अनेक मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच, आंदोलकांनी दावा केला आहे की परिसरात मोबाईल जॅमर्स बसवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चा सुरू होताच आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. संसदेच्या दिशेने मोर्चा सुरू झाल्यानंतर आंदोलक आणि आरपीएफ (RPF) जवान यांच्यात झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ‘X’ खात्यावरून मोदी सरकारवर (Modi Government) कडक शब्दांत टीका केली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर 56 इंच वाल्यांची हातभर फाटलीय. डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली, शक्य असते तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ED लावली असती. पण ते कठीण आहे. मोर्चाचा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा. Ed, सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी, शाहांच्या गुलाम झाल्या आहेत,”
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि उद्योग भवन ही पाच महत्त्वाची मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.
जंतर-मंतर परिसरात दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि निमलष्करी दलांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे. संभाव्य गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन्स आणि ‘वज्र’ ही दंगल-विरोधी वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले आहेत आणि काही ठिकाणचे बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत.
दरम्यान, या आंदोलनादरम्यान यापूर्वी २० दिवसांचे आमरण उपोषण केलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. परिणामी, जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दृष्टीने पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत गोंधळ; ‘चलो संसद’ आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज
- उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे
- भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीचा भीषण अपघात; गाडीत नसल्याने थोडक्यात बचावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












