Anil Desai | “आमदार, खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही”; युक्तीवाद सादर केल्यानंतर देसाईंची प्रतिक्रिया

Anil Desai | मुंबई : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह आमचंच आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे.

अनिल देसाई काय म्हणाले?

“आमदार खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या आहेत”, असे अनिल देसाई म्हणाले आहेत.

“21 जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात सांगितलं आहे”, असे अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button