Ajit Pawar | “पुणे शहराचे ‘जिजाऊ नगर’ नामांतर करावे का?”; अजित पवार म्हणाले, “पुणे म्हणजे…”

Ajit Pawar | पुणे : महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमानंतर पुणे शहराचं नामकरण जिजाऊनगर करावे, अशी मागणी केली आहे.  हा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. अमोल मिटकरींच्या या मागणीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी असे प्रचंड प्रश्न आहेत, हे प्रश्न असताना नवीन नवीन प्रस्ताव पुढे येतात. त्यावर आमच्यासारख्या राजकीय नेत्याला बोलणे अवघड होते. कारण तो भावनिक विषय असतो. सध्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. या प्रश्नावर चर्चा करून विश्वासात घेऊन निर्णय अपेक्षित आहे.”

“पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे. मूळ पुणेकरांना काय वाटते याचाही विचार करावा लागेल. उगीचच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचं ठरतं. कोणाचाही अनादर होणार नाही. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी”, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.

“सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. पिंपरी चिंचवडलाही पुण्याचाच भाग समजले जाते. महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि मूळ विषय भरकटवायचे असे सुरू आहे. माझी विनंती आहे की सर्वांनीच समंजस भूमिका घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

आनंद दवे यांचा विरोध

अमोल मिटकरी यांच्या मागणीवर पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. “पुणे शहराचं नाव बदलून राजमाता जिजाऊनगरी, जिजाऊनगर करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. खरंतर प्रात: स्मरणीय जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना वंदनीय आहेत. परंतु, जिजाऊमाता यांचं नाव पुण्याला नाव देणं उचित होणार नाही. लाल महालात राजमाता जिजाऊंचं सर्वात मोठं स्मारक उभारावं, अशी आमची जुनी मागणी आहे. ती का पूर्ण होत नाही, असा सवाल आनंद दवे यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या :