Weather Update | किमान तापमानात घट! मराठवाडा आणि विदर्भात वाढला गारठा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यात काही ठिकाणी थंडी आहे, तर काही भागांत अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्यात काही भागात किमान तापमानात घट झाल्याने गारठा (Cold) वाढला आहे. शुक्रवारी (3 फेब्रुवारी) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. त्यामुळे या ठिकाणी हुडहुडी वाढली आहे.

आज (4 फेब्रुवारी) राज्यातील किमान तापमानात घट होताना दिसली आहे. विदर्भामध्ये आणखी गारठा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात देखील किमान तापमान घट झाली आहे. तर, कमाल तापमानामध्ये काही अंश वाढ झाली आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाचे वातावरण तयार झाले होते. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसली होती. आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढू लागली आहे.

शुक्रवारी (3 फेब्रुवारी) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर राज्यात रत्नागिरीमध्ये उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये 35.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्यात देशात बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता (Rain Alert ) वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी गारवा राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या