स्वतःच्या घरात खायला नाही आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचायला निघाले, अशी काहीशी अवस्था सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची झाली आहे. टी-20 विश्वचषक तोंडावर असताना पाकिस्तानने घेतलेल्या एका बालिश निर्णयावर आता त्यांचेच दिग्गज खेळाडू संतापले आहेत. ‘सुलतान ऑफ स्विंग’ वसीम अक्रम (Wasim Akram) याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) चांगलीच शाळा घेतली असून, “दुसऱ्यांच्या भांडणात आपलं नुकसान का करून घेताय?” असा रोकठोक सवाल विचारला आहे.
सुरक्षेचं कारण देत बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला, त्यामुळे ICC ने त्यांना स्पर्धेतून डच्चू देत स्कॉटलंडला संधी दिली. यावर पाकिस्तानने ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत जात बांगलादेशसाठी विश्वचषकावर बहिष्कार (Boycott) टाकण्याची धमकी दिली. हे ऐकून वसीम अक्रमचा पारा चढला.
Wasim Akram Angry
अक्रमने बोर्डाचे कान टोचताना म्हटलंय, “बांगलादेश खेळायला तयार नाही म्हणून पाकिस्तानने का माघार घ्यावी? बांगलादेशने पाकिस्तान क्रिकेटसाठी आजवर काय केलं आहे? यात मला काहीच अर्थ दिसत नाही.” अक्रम इथेच थांबला नाही, तर फालतू राजकारण सोडून खेळावर लक्ष केंद्रित करा आणि विश्वचषक (World Cup) जिंकून दाखवा, असा सल्लाही त्याने खेळाडूंना दिला आहे.
एकीकडे पीसीबी माध्यमांसमोर बहिष्काराची भाषा करतंय आणि दुसरीकडे त्यांनी गपचूप आपला संघही जाहीर करून टाकलाय! सलमान अली आघा (Salman Ali Agha) याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. संघात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह अशा दिग्गजांचा भरणा आहे. त्यामुळे पाकिस्तानची ही ‘दुतोंडी’ भूमिका चाहत्यांनाही कळनाशी झाली आहे.
दरम्यान, 7 फेब्रुवारीपासून या क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होत आहे. वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा ‘महासंग्राम’ रंगणार आहे. अक्रमच्या ‘डोस’ नंतर आता पाकिस्तान शांतपणे खेळणार की पुन्हा काही नाटकं करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ती’ बातमी आली अन् काळजाचा ठोका चुकला; अजितदादांच्या निधनावर रितेश देशमुखची इमोशनल पोस्ट, म्हणाला…
- हा अपघात की घातपात?; अजितदादा भाजप सोडण्याच्या तयारीत होते म्हणून…? अजितदादांच्या मृत्यूनंतर बॅनर्जींचा मोदी सरकारवर भीषण हल्लाबोल!
- “हा अपघात की…?” अजितदादांच्या निधनानंतर ममता बॅनर्जींची मोठी मागणी; म्हणाल्या, सखोल चौकशी करा!













