दुबई, 13 सप्टेंबर: भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत आठव्यांदा महिला आशिया चषकावर मोहोर उमटवली. मात्र, या विजयापेक्षा सामन्यानंतर घडलेल्या एका घटनेची सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे नक्वी स्टेडियममधून निघून गेले.
एसीसी अध्यक्ष या नात्याने नक्वी ट्रॉफी देण्यासाठी आले होते. त्यांनी श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू हिला उपविजेतेपदाचा धनादेशही दिला. मात्र, भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सामना रात्री 11:25 वाजता संपल्यानंतर, नेहमीच्या सादरीकरण समारंभाऐवजी प्रसारकांनी आधीच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. जवळपास वर्षभरापूर्वी याच मैदानावर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघानेही अशीच भूमिका घेत ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
Womens Asia Cup trophy from Mohsin Naqvi
शफाली वर्माचे विक्रमी अर्धशतक आणि भारताचा मोठा विजय
या अंतिम सामन्यात भारताची सलामीवीर शफाली वर्माने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावत महिला आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रचला. तिने 2022 मध्ये स्मृती मंधानाने (25 चेंडू) श्रीलंकेविरुद्धच केलेला विक्रम मोडला. या स्पर्धेतील शफालीचे हे तिसरे अर्धशतक असून, एकाच हंगामात सर्वाधिक तीन अर्धशतके झळकावण्याच्या चमारी अटापट्टूच्या (2024) विक्रमाशी तिने बरोबरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना शफालीने 68 आणि मंधानाने 59 धावांची दमदार खेळी केली. या दोघींच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 बाद 183 धावांचा डोंगर उभारला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 111 धावांवर गारद झाला. भारताकडून श्री चरणी हिने उत्कृष्ट गोलंदाजी करत 20 धावांत 4 बळी घेतले आणि भारताला विक्रमी आठवे विजेतेपद मिळवून दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताचा महिला आशिया चषकावर 8 व्यांदा कब्जा, मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
- महिला आशिया चषकावर भारताचे वर्चस्व; अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा
- मुंबईत मनोज जरांगेंना ‘नो एन्ट्री’, पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारली












