#Budget 2023 | आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय महाग?

#Budget 2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक आणि राजकीय वर्तुळात आजचा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरला होता. आज होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणांतून काय वस्तू महाग काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पातील घोषणांमध्ये सर्वांच्या नजरा मदतीच्या योजनांकडे लागल्या आहेत. कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, याचीही लोकांमध्ये उत्सुकता आहे. आयकरात सवलत मिळाल्यानंतर, बहुतांश लोकांना स्वस्त किंवा अधिक महाग असलेल्या गोष्टींबाबत माहिती करुन घ्यायची असते.

अर्थसंकल्पात आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. 35 हून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क वाढवलं ​​जाऊ शकते. विविध मंत्रालयांच्या शिफारशींनंतर सरकारने यादी तयार केली आहे. या यादीमध्ये 35 वस्तूंचा समावेश आहे. ज्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवलं ​जाऊ शकते त्यात खाजगी जेट, हेलिकॉप्टर, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, हाय ग्लॉस पेपर, स्टील उत्पादने, चामडे आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश आहे.

करात वाढ आणि आयातीतील घट यामुळे या वस्तूंच्या उत्पादनाला देशात प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ मिळणार आहे. गेल्या वर्षीही अर्थसंकल्पात सरकारने अनेक गोष्टींवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. आयात शुल्क वाढवणं हा सरकारच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. कारण सरकारला त्या वस्तूंच्या उत्पादनाला चालना द्यायची आहे.

देशातून दागिने आणि इतर तयार उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 12.5 टक्के आणि 2.5 टक्के कृषी उपकरासह 15 टक्के केला होता. त्यामुळे ज्वेलरी उद्योगाला मोठा फटका बसला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार त्यांना दिलासा देऊ शकतं, असं समजलं जात आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय रत्ने आणि आभूषण क्षेत्रासाठी सोन्यासह काही वस्तूंवरील आयात शुल्क कर कमी होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पापूर्वी विविध मंत्रालयांनी आपापल्या शिफारशी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला पाठवल्या आहेत, ज्यावरुन अंदाज येईल की आजच्या बजेटमध्ये कोणत्या वस्तू स्वस्त असतील आणि कोणत्या वस्तू महाग होतील.

महत्वाच्या बातम्या