Yugendra Pawar : काही दिवसांपूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्याआधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोदींची भेट घेतली होती.
मात्र, या भेटींनंतर शरद पवार यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधानांशी झालेल्या भेटी या लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून जनतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी होत्या. आता युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून, त्यांच्या आगामी बारामती दौऱ्याबाबत माहिती दिली आहे.
Yugendra Pawar praises PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील स्वागत समारंभाला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी मोदींची भेट घेतली. त्यात युगेंद्र पवारही त्यांना भेटताना दिसले. आता युगेंद्र यांनी पंतप्रधानांच्या कामाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबर रोजी बारामतीला भेट देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी विश्वास व्यक्त केला की, शरद पवार यांच्या विनंतीचा मान राखून पंतप्रधान नक्कीच येतील. त्यांनी पंतप्रधानांच्या कामगिरीचेही कौतुक केले आणि म्हटले, “मलाही त्यांचा अभिमान वाटतो; ते प्रभावीपणे काम करत आहेत.”
युगेंद्र यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चेवरही भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीच्या खासदारांची मोदींशी झालेली भेट म्हणजे अशी कोणतीही युती नव्हे.
युगेंद्र पवार पुढे म्हणाले की, “मी सुद्धा पंतप्रधानांना भेटलो. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. कामासंदर्भात भेटण्यात काय चूक आहे? लोकांची कामे करून घेण्यासाठी सत्तेतील व्यक्तींना भेटण्यात काय गैर आहे?”
“बारामती पोरकी झाली आहे, दादा मोठे नेते होते, पुन्हा तसा दादा होणं शक्य नाही. दादांची नाळ बारामतीकरांशी जोडली गेली होती, आम्ही तसा प्रयत्न करतोय. सत्ता नसताना आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सत्तेतील लोकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे.” असे युगेंद्र पवार म्हणाले.
बारामतीत गुन्हेगारी वाढली आहे
बारामतीत वाढत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात युगेंद्र पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “बारामतीत गुन्हेगारी वाढली आहे. ‘दादां’चा मोठा दरारा आणि आदर होता, पण आता तो दरारा राहिलेला नाही. सत्तेत असलेल्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सरकारी अधिकाऱ्यांना सक्षम केले पाहिजे. दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. सत्तेत नसतानाही आम्ही जनतेसाठी काम करत आहोत.”
“जनतेने आम्हाला ५० वर्षे साथ दिली आहे, त्यामुळे आम्ही काम करतच राहू. आमचे नगरसेवक नगरपालिकेत हा मुद्दा मांडत आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत आम्ही नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची भेट घेऊन जनतेच्या तक्रारी मांडू. आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. बारामतीत भ्रष्टाचार होऊ देणार नाही आणि आम्ही हे चालून देणार नाही, त्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही विरोधक म्हणून लढत राहू, असेही युगेंद्र पवार यांनी म्हटले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवार गटाचा मोठा डाव! पुण्यात दोन शहराध्यक्ष; दोघांवर मोठी जबाबदारी
- Junnar Crime: ‘महाराष्ट्र उत्तर प्रदेश-बिहारच्या पुढे चालला’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
- Monsoon 2026: देशात दुष्काळाचा धोका वाढला; ‘स्कायमेट’चा 85 टक्के पावसाचा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











