Sushma Andhare । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता याच गटाच्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणी वाढल्या आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आज न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.
नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्यावर १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आला होता. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कोकाटे यांच्यावर आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे X वर लिहितात, “सध्या मंत्रिमंडळ आणि लोकप्रतिनिधींमधून कमीत कमी 1/3 लोकांवर विविध खटले चालू आहेत. हे लज्जास्पद आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निगरगट्टपणे सरकारमध्ये थांबणे इथपर्यंत ठीक; मात्र जिल्हा न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर अशा मंत्र्याचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे,” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान, आता धनंजय मुंडे यांच्यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील घेरू शकतात. त्यामुळे अजित पवार कोकाटे यांचा राजीनामा घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही तर अजित पवार गट आणि महायुती सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते, यात काही शंकाच नाही.
महत्त्वाच्या बातम्या :