बीड । जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात ( Santosh Deshmukh Murder Case ) महाराष्ट्र सरकारने उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. देशमुख कुटुंबाच्या विविध मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी मान्य करण्यात आली आहे. तसेच, धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
Sushma Andhare comment on Ujjwal Nikam
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, ”आनंद व्यक्त करण्याआधी निकम यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणे गरजेचे आहे. २००६ च्या खैरलांजी हत्याकांडामध्ये दलित कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झाली होती. अल्पवयीन प्रियंका हिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करून हालहाल करून मारले गेले.
४० आरोपींपैकी केवळ ११ जणांवर खटला चालवला गेला आणि कोणालाही फाशीची शिक्षा सुनावली गेली नाही. खटला चालू असतानाच 11 पैकी दोघांचे मृत्यू झाले. कुटुंबातला शेवटचा माणूस भैय्यालाल न्याय मागता मागता 2017 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला. या प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील होते.
अंधारे यांनी अजमल कसाबच्या प्रकरणाचाही उल्लेख केला आणि सांगितले की, कसाबला फाशी मिळाली ती पुराव्यांच्या जोरावर, वकिलाच्या कौशल्यामुळे नव्हे. तसेच, त्यांनी निदर्शनास आणले की, उज्ज्वल निकम यांच्या मुलाने धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचे वकीलत्व केले होते आणि निकम भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढले होते. अंधारे यांनी फडणवीस यांच्या गृहखात्याच्या काळात परळी आणि बीडमध्ये पोलिसांकडून होत असलेल्या कारवायांचा मुद्दाही उपस्थित केला. देशमुख हत्या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई झाली नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला.
या प्रकरणात कोण वकील असावा हे ठरवण्याचा अधिकार पीडित कुटुंबाला आहे. जर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मान्य केली असेल, तर त्यांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या