Ramdas Kadam । माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. अशातच आता राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून राजन साळवी यांची ओळख होती. पण मागील काही काळांपासून विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याशी राजन साळवी यांचा वाद होत होता. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्याने साळवी नाराज होते. अखेर आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरून आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
“मी अगोदरच सांगितले होते की उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणीच शिल्लक राहणार नाही. राजन साळवींचा पक्षप्रवेशामुळे ठाकरेंना राजकीय चपराक लागली आहे. पक्ष प्रवेशासाठी अजून बरेच लोक रांगेत उभे आहेत. मातोश्रीकडे हम दो, हमारे दो एवढेच शिल्लक राहणार आहे,” असा इशारा कदम यांनी दिला आहे.
Ramdas Kadam on Uddhav Thackeray
“राजन साळवी यांनी योग्य वेळेत योग्य निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळे संपलेले आहे, हे त्यांनी राज्याला दाखवून दिले आहे. साळवी यांचा काल मला फोन आला. भाई मी तुमच्यासोबत येतोय, माझ्यावर लक्ष ठेवा, असे सांगायला फोन केला होता. वैभव नाईक आणि माझे जवळचे संबंध असून मी त्यांना आतापर्यंत फोन केला नाही,” असे रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे वैचारिक मतभेद नव्हते. शरद पवारांचा (Sharad Pawar) अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे आपण कोणावर काय बोलतो याचे भान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठेवावे,” असा सल्ला कदम यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :