Magh Vari Utsav | श्रीक्षेत्र अनवा येथील माघ उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

Magh Vari Utsav | भोकरदन: श्रीक्षेत्र अनवा येथे सुरू असलेल्या माघ वारी उत्सवाची सांगता शुक्रवार दि.०३ फेब्रुवारी रोजी संत श्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये श्रीरुख्मिणी पांडुरंग संस्थानचे पंधरावे विद्यमान अधिपती प.पू. गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माऊली चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. ३१ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले.

“कंठी धरीला कृष्णमणी ।अवघा जनी प्रकाश ll
काला वाटू एकमेका । वैष्णव निका संभ्रम ll ”

या संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुरुवर्य श्री माऊली महाराजांनी गोपालकाल्याचे चिंतन केले. ज्यांनी आपल्या कंठामध्ये कृष्ण नामरुपी मणी धारण केला आहे, त्यांचा प्रकाश अवघ्या जगात पडला आहे, कोणतेही नाम कंठात घ्या आपले चित्त शुद्धी होईल, असे गुरुवर्य श्री महाराजांनी सांगितले. श्रीकृष्ण चरित्रातील ‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या-त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत.

पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक.
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक

या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात, असे गुरुवर्य श्री माऊली महाराजांनी सांगितले. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली आणि  कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी ह.भ.प.श्री कैवल्य महाराज चातुर्मास्ये, ह.भ.प.श्री परमेश्वर महाराज गोंडखेडकर, ह.भ.प.श्री. राधेश्याम महाराज चातुर्मास्ये, ह.भ.प.श्री राज महाराज चातुर्मास्ये, ह.भ.प.श्री पराग महाराज चातुर्मास्ये, ह.भ.प.श्री.संदीप महाराज वाढेकर यांच्यासह श्रीक्षेत्र अनवा परिसरातील तसेच मराठवाडा, खान्देश, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आदी भागातून आलेले शेकडो भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या