शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे शिवसैनिकांची जबाबदारी
Ambadas Danve : शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाप्रमाणे आगामी काळात आपल्याला संघटनेचे कार्य करण्याचे आहे. कोणतीही राजकीय ताकद नसताना जुन्या शिवसैनिकांनी पक्षाला राज्याच्या सत्तेपर्यंत पोहचविले होते.अशाच प्रकारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आणण्यासाठी आता शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे शिवसैनिकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
संभाजीनगर जिल्हाव्यापी गुरुवार ता. २५ जुलै रोजी शिवसंकल्प मोहिमेनिमित्त लासुर स्टेशन, शिल्लेगांव, अंबेलोहळ, गंगापूर शहर व जामगांव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांची दानवे यांनी बैठक घेऊन संवाद साधला. नवनवीन कार्यक्रम व उपक्रम हाती घेतल्याशिवाय संघटना वाढत नाही. तालुक्यातील १८ हजाराच्या आसपास शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाचा विमा तसेच नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांच्या विषयांचा अभ्यास करून त्यांच्या विरोधात आवाज उठवून जनजागृती करणे आवश्यक असल्याची सूचना दानवे यांनी शिवसैनिकांना केली.
जिल्ह्यात गावागावात शिवसेनेचे कार्यकर्ते असून त्यांच्यापर्यंत पोहचणे संघटना म्हणून आपले कर्तव्य आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत गंगापूर विधानसभा मतदारसंघ मजबुत करायचा आहे. तसेच निवडणूकीत विजय मिळवायचा असेल तर संघटनेची ताकद वाढवावी लागेल अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र मोहिम शिवसैनिकांनी सुरू करायला हवी. पक्षाचा लोकप्रतिनिधी नसला तरीही येथे शिवसेनेची ताकद कमी झालेली नाही. क्षमतावान नवयुवकांना संघटनेत समावून घेऊन त्यांना त्यांच्या कार्य पद्धतीनुसार कार्यक्रम हाती दया,असे दानवे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कळविले.
महत्वाच्या बातम्या