MHADA Lottery | मुंबई सारख्या महानगरात स्वतःच्या हक्काचं घर मिळवणं सध्याच्या काळात किती कठीण झालंय? फक्त २,६४० घरांसाठी तब्बल ७५,३६६ लोकांनी अर्ज सादर केले आहेत, या धक्कादायक आकड्यावरूनच घरांची टंचाई स्पष्ट होते. येथे एका घरासाठी सरासरी २८ पेक्षा जास्त लोक शर्यतीत उतरले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने विक्रीसाठी काढलेल्या या घरांच्या सोडतीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. प्रशासनाने घरांच्या विक्री किमती काही प्रमाणात कमी केल्यामुळे आणि मोक्याच्या जागांवर पार्किंगसह उत्तम सुविधा दिल्याने मुंबईकरांनी म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांवर पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला आहे.
MHADA Mumbai Lottery 2026
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची राजकीय धामधूम पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या कडक नियमांनुसार संपूर्ण राज्यामध्ये सध्या आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेची अंतिम मुदत २५ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियम शिथिल होणार नाहीत, त्यामुळेच म्हाडा प्रशासनाने घरांच्या सोडतीची निश्चित तारीख, वेळ आणि ठिकाण अद्याप जाहीर केलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहिता संपताच अंतिम सोडतीची मुख्य घोषणा केली जाईल. दुसरीकडे, म्हाडा प्रशासनाने सर्व सामान्य अर्जदारांच्या सुविधेसाठी पुढील छाननी प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक मात्र आधीच जाहीर करून दिलासा दिला आहे. या नियोजित प्रक्रियेनुसार, येत्या १० जून २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व प्राप्त अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे अर्जदारांना स्वतःचे नाव तपासणे सोपे होईल.
जर या यादीमध्ये नाव नसेल किंवा अर्जात काही तांत्रिक त्रुटी आढळल्यास, संबंधित अर्जदारांना १२ जून २०२६ च्या दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने म्हाडाकडे आपल्या हरकती आणि दावे अधिकृतपणे दाखल करता येणार आहेत. नागरिकांनी दाखल केलेल्या या सर्व हरकतींची म्हाडाच्या विशेष समितीकडून कसून छाननी केली जाईल. त्यानंतर १६ जून रोजी दुपारी ठीक ३ वाजता सोडतीसाठी स्वीकृत झालेल्या पात्र अर्जदारांची अंतिम यादी संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- अब्दुल सत्तार यांची दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद, संजय राऊतांचा थेट सवाल… खरोखरच पडद्यामागे काही शिजतंय?
- अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरच राडा, …अन् सावे यांनी रागात फोन कट केला
- पार्थ पवार खूप जोरात पळतायत का? प्रश्नांवर सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट












