Uday Samant | “रोज सकाळी टीका करणाऱ्या हितचिंतकांना…”; उदय सामंतांचा संजय राऊतांना टोला 

Uday Samant | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांसाठी दावोस येथे गेले होते. या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात कोट्यवधींचे उद्योग आल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उदय सामंत (Uday Samant) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जे भाषण केलं ते महाराष्ट्राच्या उद्योग जगताला आणि महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला दिशा देणारं भाषण होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची जी पूर्ण टीम आली आहे. ती विविध सामंज्यस करार करण्यात यशस्वी झाली आहे. आम्ही त्यावरच थांबणार नाही तर या करारांची अंमलबजावणी कशी राज्यात होईल हे पाहणार आहोत.”

मी आमच्या रोज सकाळी उठून टीका करणाऱ्या हितचिंतकांना सांगू इच्छितो की शिंदे फडणवीस सरकारच्या काळातच महाराष्ट्राचा योग्य दिशेने विकास होतो आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे. आज आम्ही दावोसमध्ये येऊन जे MoU केले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात विविध प्रकल्प येणार आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी उद्योग व्यापले गेले पाहिजेत असाच आमचा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचं उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समाधानी आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माध्यमांशी बोलताना म्हणाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button