🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी रात्री मुंबई ते नागपूर (Nagpur) असा एकाच विमानातून प्रवास केला. उद्धव ठाकरे हे ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करण्यासाठी नागपूरला रवाना झाले होते. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसही त्याच विमानात होते. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून त्यांनी केवळ एकमेकांची विचारपूस केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि खासदार अनिल देसाई (Anil Desai) हे नेतेही उपस्थित होते.
या विमान प्रवासावर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. हे एक सामान्य विमान होते आणि प्रवासादरम्यान नेते एकमेकांना भेटणे किंवा संवाद साधणे ही सामान्य बाब असल्याचे त्यांनी सांगितले. दोन नेते एकाच विमानातून प्रवास करत असतील तर त्यात गैर काही नाही, हा केवळ योगायोग असल्याचे रोहित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी “आपण तिघे भेटलो हीच बातमी आहे,” असे म्हटल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तीन नेते एकाच दिशेने प्रवास करत असतील तर ती बातमी होऊ शकते, असे ते म्हणाले.
यावेळी रोहित पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना दोनदा फोडण्यात आला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासारख्या स्वाभिमानी नेत्याने मांडवली करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असून ते स्वाभिमानी आहेत. त्यामुळे ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबत ते जाऊन तडजोड करतील, अशी चर्चा होणे हास्यास्पद असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
भाजप नेत्यांकडून फडणवीस-ठाकरे भेटीवर सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याबाबत विचारले असता रोहित पवार यांनी यावर भाष्य केले. भाजपची भूमिका सकारात्मक असेल तर त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर नाही, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही अडचणीची बाब ठरू शकते, असे त्यांनी म्हटले.
रोहित पवार म्हणाले की, सध्या खासदारांची संख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. सीमांकन (Delimitation) विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे २० आणि उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार महत्त्वाचे ठरू शकतात, असेही त्यांनी सांगितले. मात्र, हा कायदा मंजूर होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जर भविष्यात हा कायदा मंजूर झाला, तर सध्याच्या खासदारांचे महत्त्व शून्य होईल, असा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच भाजप सध्या सत्तेच्या समीकरणांसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“2029 च्या निवडणुकीपूर्वी परिस्थिती बदलू शकते. सध्या दाखवले जाणारे प्रेम हे राजकीय गरजांमुळे आहे. वेळ गेल्यानंतर भाजप दोन्ही पक्षांना डच्चू देईल,” असा दावा रोहित पवार यांनी केला.
उद्धव ठाकरे सहा फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी सांगितले की, स्थानिक कार्यकर्त्यांना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.या सहा खासदारांना निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता, तसेच त्यांना शरद पवार यांनीही खंबीर साथ दिली होती, असे रोहित पवार म्हणाले. त्यामुळे या खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे नागपूरला पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. या सहा खासदारांचा निर्णय जनतेला आणि शिवसैनिकांना आवडलेला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरेंचा नवा राजकीय रणसंग्राम! “भाजपमुक्त रामासाठी आंदोलन करणार”
- आधी NEET, आता TET! महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र सुरूच…
- ‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












