Shivsena | “मगरीने बेडूक गिळावा असे मिंधे सरकार…”; शिवसेनेची भाजपवर आगपाखड

Shivsena | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे.

“पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने मुंबई नगरी त्यांच्या झेंड्याने सजवली आहे. त्यात कोठे तरी मिंधे गटाने त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे व मगरीच्या जबड्यात जाताना बेडूक अखेरचे डराव डराव करीत आहे असेच चित्र दिसत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत लावलेल्या कटआऊट्समध्ये बाळासाहेबांपेक्षा भाजप नेत्यांचे कटआऊट्स मोठे दिसत आहेत. स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिंधे यावरही मूग गिळून का बसले आहेत?” असा सवाल संतप्त सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.

“पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नागरी कामांचेच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येत आहेत. भाजपने या कामाचे श्रेय भलेही घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सर्व काही माहीत आहे”, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

“पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे. पंतप्रधानांच्या शुभहस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवसेनेच्या कार्यकाळात ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत व त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे”, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या