बीड । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ माजवणारी ही घटना ठरली. सीआयडीने हत्येच्या तपासात 1,800 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे, ज्यात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याला घोषित करण्यात आले आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे. देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत.
खंडणीची मागणी Dhananjay Munde यांच्या कार्यालयातूनच!
वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि इतर आरोपींनी धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबावरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे या प्रकरणात मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वाल्मिक कराडने आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना खंडणीची मागणी केली होती. सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना धमकी दिली होती, की काम सुरू ठेवायचं असेल तर खंडणीची मागणी पूर्ण करा, अन्यथा काम बंद करणार अशी धमकी देण्यात आली होती.
Dhananjay Munde यांच्या सातपुडा बंगल्यावरही खंडणीची बैठक
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून खंडणी मागितल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच मुद्द्यावर सुरेश धस यांनी आरोप केला आहे की, मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरही खंडणीची बैठक घेतली गेली होती. विरोधक मुंडेंवर गंभीर आरोप करत, संतोष देशमुख यांच्या हत्येतील त्यांचा सहभाग स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशीची मागणी करत आहेत.
धनंजय देशमुख आणि वैभवी यांची प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “खंडणी कोणाकडून आणि कशासाठी मागितली जात होती हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. त्या मुख्य सूत्रधाराला पकडले पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे, आणि देशमुख कुठंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जनतेने दबाव आणला आहे. महाराष्ट्रातील या गंभीर प्रकरणाच्या पुढील तपासावर सर्वांचं लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या