Sanjay Raut | “कुणाचा पोपट उडतोय…”; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खोचक टीका केली होती. पोपट मेला आहे, पण उद्धव ठाकरेंना हे कोणी सांगत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही वाक्य आहे. त्यांनी कालच्या बैठकीमध्ये ती देखील वाचून दाखवायला हवी होती. खिल्ली कोणत्या गोष्टीची उडवायला हवी? काल झालेल्या बैठकीमध्ये त्यांचे अर्धे लोक झोपलेले होते. ते झोपलेल्या लोकांसमोर बोलत होते. त्यांचे काही मोठे नेते झोपले होते तर काही नेते जांभया देत होते. देवेंद्र फडणवीस अशा मेलेल्या कार्यकर्त्यांसमोर आमची खिल्ली उडवतात.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे. मात्र, त्या पोपटाला बेकायदेशीरपणे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न हे करत आहेत. विधानसभा अध्यक्षांविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे. ते घटनात्मक पदावर विराजमान झालेले आहेत. परंतु घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती शेवटी राजकीय असते. तरीही आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे.”

“कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होते, हे त्यांना लवकरच कळणार आहे. ताबडतोब निवडणुका घ्या, मग कुणाचा पोपट मेला आहे, हे ताबडतोब जनतेला आणि तुम्हाला दाखवता येईल,” असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या