🕒 1 min read
नवी दिल्ली | जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करत “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत हल्ले करून सुमारे १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
या कारवाईनंतर पाकिस्तानने गेल्या २–३ दिवसांपासून ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र प्रहार आणि सीमांवरील गोळीबारासह सतत उग्र हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र भारतानेही संयम न गमावता प्रत्येक पाकिस्तानी हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर दिले असून, शत्रूचे अनेक डाव हाणून पाडण्यात आले आहेत.
Operation Sindoor: India Destroys Pakistan Airbases
भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे लक्षणीय नुकसान झाल्याची माहिती आहे. रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, चकवालजवळील मुरीद एअरबेस आणि शोरकोटमधील रफीकी एअरबेसवर निशाणा साधण्यात आल्याचे समजते. या कारवायांमुळे या परिसरांतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने आपले संपूर्ण हवाई क्षेत्र आज दुपारी १२ वाजेपर्यंत तात्पुरते बंद केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) चे PIA-218 हे पेशावरकडे जाणारे शेवटचे उड्डाण क्वेट्टावरून हलवावे लागले.
भारतीय हल्ल्यात नूर खान बेसवरील केवळ कारचे नुकसान- पाकिस्तान
भारताने केलेल्या हवाई कारवाईनंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानच्या कोणत्याही हवाई तळाचे मोठे नुकसान झालेले नाही. फक्त रावळपिंडीतील नूर खान एअरबेसवर एका कारचे नुकसान, तर इतर ठिकाणी केवळ ड्रोन हल्ल्यांमुळे काही किरकोळ जखमींची नोंद झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पाकिस्तानच्या PTV या सरकारी वृत्तवाहिनीने दावा केला आहे की, भारताच्या हल्ल्यामुळे रहिम यार खान येथील शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकसान झाले आहे. भारताने पाकिस्तान आणि यूएईमधील मैत्रीचे प्रतीक असलेल्या या विमानतळाला लक्ष्य केले, असल्याचे PTV ने सांगितले.
या घटनांमुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही देशांच्या सैन्य यंत्रणा हाय अलर्टवर असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संयम बाळगण्याचे आवाहन होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत-पाक संघर्षाच्या छायेत परमाणु धोका वाढतोय – पाक संरक्षण मंत्र्यांची कबुली
- FACT CHECK | BJP, निवडणूक आयोगासह अनेक सरकारी वेबसाइट्स हॅक? पाकिस्तानचा मोठा दावा
- भारत-पाक तणावात अमेरिकेचा हस्तक्षेप; मार्को रुबियो आणि जनरल मुनिर यांच्यात चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












