Nitesh Rane । देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, नितेश राणे सारख्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार? पण आमचा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे की, आजच प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीगत खर्चाच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राला बिहार व उत्तर प्रदेशच्या बरोबर नेऊन ठेवले आहे.
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा ही गैरभाजपा शासित राज्ये यात दुपटीने आघाडीवर आहेत. शहर व ग्रामीण भागातील लोक जास्त कमावतात व जास्त खर्च करण्याची क्षमता ठेवतात हे सरकारचे आकडे आहेत. भाजपाने महाराष्ट्रात धर्मांधता व द्वेषाचे विष पेरल्याने राज्याची ही अवस्था झाली आहे म्हणूनच, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचारावा लागत आहे.
राज्यात सर्वात जास्त बेरोजगारी व महागाई आहे, शेतमालाला भाव नाही, एक जात दुसऱ्या जातीविरोधात लढवली जात आहे, हिंदू मुस्लीम तणाव वाढत आहे, रोज खून, बलात्कार होत आहेत. याला कारण धर्मांधता व द्वेषाचे राजकारणाच जबाबदार आहे. मंत्री नितेश नारायण राणे यांचे विधान महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित करणारे असून भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा करावा, असेही अतुल लोंढे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या