दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या (Paper Leak) मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, “नीटचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच नैराश्य आले असेल. मात्र, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने तयारी केली आणि पुन्हा घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत मोठे यश मिळवले.” त्यांनी केलेल्या या विधानावरून आता त्यांच्यावर विरोधकांकडून (Opposition) जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. पेपरफुटीच्या घटनेचे जणू समर्थनच त्या करत आहेत, असा आरोप ‘सीजेपी’ (CJP) आणि विरोधी पक्षांनी केला आहे.
‘आव्हानाचा सामना करून विद्यार्थ्यांनी यश मिळवले’
पुढे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, “असे अनेक तरुण आहेत जे पुढे येऊन सांगत आहेत की, जेव्हा पेपर लीक झाला तेव्हा आम्हाला वाईट वाटले. पण आम्ही त्या परिस्थितीचा सकारात्मक फायदा घेतला आणि अधिक मेहनत घेऊन आमची कामगिरी सुधारली. त्यामुळे अशा आव्हानांना स्वीकारून यश मिळवणारे तरुणही देशात आहेत.”
विरोधकांना सीतारामन यांचे प्रत्युत्तर
सीतारामन पुढे म्हणाल्या, “या घटनेनंतर सरकारने त्वरित पावले उचलली. आरोपींना अटक करण्यात आली, वेळेवर फेरपरीक्षा घेण्यात आली आणि निकालही जाहीर करण्यात आले. परिणामी, आता तरुण आपल्या गुणवत्तेच्या आधारे महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवत आहेत. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे, कारण तो देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांच्या परीक्षेच्या तयारीशी संबंधित आहे. जर सरकारने असंवेदनशीलता दाखवली असती किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती, तर विरोधकांची टीका समजण्यासारखी ठरली असती. मात्र, खुद्द पंतप्रधानांच्या पातळीवरून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, ‘सीजेपी’चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी निर्मला सीतारामन यांच्या विधानावर टीका केली. ‘X’ वर सीतारामन यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली: “या तर्काने तर देशातील प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटायला हवा.” दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही ‘X’वर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, “सीतारामन यांना असे सुचवायचे आहे का की, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळाला आणि त्यामुळे ते अभ्यास करून चांगली कामगिरी करू शकले? वास्तविक पाहता, आता संपूर्ण मंत्रिमंडळानेच राजीनामा देण्याची वेळ आली आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- NEET वादात राघव चढ्ढा अचानक अॅक्शन मोडवर; मोदींच्या पोस्ट केल्या रीपोस्ट
- राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्हे अलर्टवर
- ‘मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?’; सोनम वांगचुक संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












