Nana Patole | “पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची काँग्रेसची परंपरा भाजपने मोडली”; नाना पटोलेंची भाजपवर टीका

Nana Patole | मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सध्या पुण्यात या दोन्हीही पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत बैठका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन याबाबत आढावा घेतला आहे. यावेळी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्याने या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार आहे.

“काँग्रेसने कसबा पेठेत तयारी केली आहे. मात्र, अजून भाजपने तसा काही प्रस्ताव पाठविला नाही त्यामुळे तशी चर्चा करण्याचे कारण नाही”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘पुण्यातील दोन्ही निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली आहे. याशिवाय बिनविरोध निवडणूक करण्यासाठी तयारीही दुसऱ्या बाजूला भाजपकडून सुरू आहे’ असे म्हणाले. त्यावरुन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जुना संदर्भ देत भाजपवर टीका केली आहे.

“गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळी काँग्रेसने बिनविरोध निवडणूकीची परंपरा सुरू केली होती, पण भाजपने ही परंपरा मोडली आहे. उमेदवार देण्याची सुरुवात त्यांनी केली आहे. त्यामुळे चर्चा करण्याचे कारण नाही, अजून भाजपने तसा प्रस्तावही दिला नाही. पण काँग्रेसने तयारी सुरू केली आहे” असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणुक लढू नका अशी विनंती करणार आहे’. मात्र नाना पटोले यांनी सांगितले की, ‘भाजपकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय आला नाही म्हणून आम्ही निवडणूकीची तयारी करत आहोत’.

महत्वाच्या बातम्या 

Back to top button