🕒 1 min read
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता ( Kolkata ) पुन्हा एकदा एका भीषण घटनेने हादरली आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी आर. जी. कर रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेची दाहकता विसरण्यापूर्वीच, आता कोलकाता येथील एका प्रतिष्ठित लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, बुधवार, २५ जून रोजी संध्याकाळी ७.३० ते १०.५० दरम्यान ही लाजिरवाणी घटना घडली. कायद्याचं शिक्षण घेणारी २४ वर्षीय पीडित विद्यार्थिनी परीक्षेशी संबंधित फॉर्म भरण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, ती सुरुवातीला कॉलेजमधील एका रूममध्ये बसली होती. त्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपीने कॉलेजचे गेट बंद करायला सांगितले आणि सुरक्षा रक्षकाच्या खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
Kolkata Law College Gang Rape
या घटनेत दोन विद्यार्थी आणि कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हा कर्मचारी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून, तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भयानक! २५ जून रोजी कोलकाता येथील एका महाविद्यालयात एका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी आणि दोन महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनीच या घटनेचा समावेश असल्याचं धक्कादायक वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या एका सदस्याचाही यात सहभाग असल्याचे वृत्त आहे.”
मालवीय यांनी पुढे म्हटले आहे की, “ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत, पश्चिम बंगाल महिलांसाठी एक भयानक बनलं आहे. बलात्कार ही एक नेहमीची शोकांतिका बनली आहे. भाजप संबंधित पीडिता आणि तिच्या कुटुंबाबरोबर आहोत, प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
या घटनेमुळे कोलकाता शहरात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकीय टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यातील ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे, मुंबईत मोठे फेरबदल
- गुणरत्न सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल! भाजपने त्याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर दात उराणार नाहीत!
- बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! टीकेला कंटाळून मेधा कुलकर्णी रडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












