Keshav Upadhye | “कॉपीबहाद्दर, कारवर उभं राहून बाळासाहेब होता येत नाही”; उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणावरुन केशव उपाध्येंची टीका

Keshav Upadhye | मुंबई : राज्याच्या राजकारणात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच शिवसैनिकांमध्ये जाऊन भाषण केलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’च्या बाहेरच गाडीतून कार्यकर्त्याना आव्हान केलं आहे. शिंदे गटाला गद्दार म्हणत शिवसेना संपणार नाही असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

बाळासाहेब ठाकरेंची आठवण

उद्धव ठाकरेंच्या गाडीतून भाषण करत असताना उपस्थितांना चटकन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली. हजारो शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले आणि उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देऊ लागेल. यावेळी शिवसैनिकांनी महाराष्ट्र गीतही म्हटलं. ‘उद्धव ठाकरे आगे बढो’ अशा घोषणाही सुरू होत्या. उद्धव ठाकरेंनी गाडीतूनच शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसैनिकांना चटकन बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली. त्यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

केशव उपाध्येंचं ट्वीट (Keshav Upadhye’s twit)

गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. एका बाजूला कारच्या बॉनेटवर उभे असलेले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असा फोटोही ट्विट केला आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे की शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष आणि पक्षाचं चिन्ह निसटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी धक्का मानला जातो आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन चिन्ह आणि पक्ष चोरणाऱ्या चोरांमुळे आणि त्यांचं कौतुक करणाऱ्यांमुळे काही फरक पडत नाही असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

“गद्दारांना गाडून शिवसेना वाढवा, कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे. या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील. न्यायामूर्ती झाले. त्यांनी गुलाम अवतीभवती ठेवले आहे. गुलामांना आव्हान आहे. शिवसेना कुणाची. शिवसेना ही जनतेला ठरवू द्या. यांचा डाव सुरू आहे. यांना ‘ठाकरे’ नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नको. त्यावेळी मोदींनी नाव घेऊन मते मागत होता. तेव्हा युती होती. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालू यायचे. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत आहे”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला ओपन चॅलेंज

“मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे. उद्या मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते”, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-