Uddhav Thackeray | “शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, मर्द असतील तर त्यांनी…”

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे.

“मर्द असतील तर धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं”

“ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार

“लोकशाहीच्या दृष्टीने घातक, लोकशाहीला श्रद्धांजली वाहून देशात बेबंदशाही सुरू असल्याचे सांगा. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. न्यायालयात लढाई सुरू असताना आयोगाने निर्णय देवू नये, मात्र आता धनुष्यबाण चोरलेला आहे. हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे “, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने शेण खाल्लं

“आज आमचं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव चोरट्यांनी चोरलं आहे. चोर मोठे झाले आहेत. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो देताना शेण खाल्लं जर असंच होणार असेल तर लोकशाहीची हत्याच होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लोकशाहीला आदरांजली वहावी आणि आम्ही बेबंदशाही देशात सुरू करतो आहोत हे जाहीर करावं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे,” असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-