🕒 1 min read
क्रिकेटच्या मैदानात सामना जिंकला तरी खऱ्या हिरोवरून अनेकदा वाद होतातच, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला धुळीस मिळवत फायनल गाठली, पण आता या विजयानंतर एका नव्याच चर्चेने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. पण माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला (Irfan Pathan) मात्र हा निर्णय अजिबात पटलेला नाही. त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना यावर थेट नाराजी व्यक्त केलीय.
IND vs ENG T20 WC
इरफानच्या मते, हा पुरस्कार संजूला नाही तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मिळायला हवा होता. तो म्हणाला, “ज्या सपाट खेळपट्टीवर दोन्ही संघांनी मिळून जवळपास 500 धावा कुटल्या आणि जिथे बाकीचे गोलंदाज 10 ते 15 च्या इकॉनॉमीने मार खात होते, तिथे बुमराहने अतिशय कठीण षटकं टाकत अवघ्या 33 धावात 1 बळी घेतला.”
कर्णधार सूर्यकुमार यादवने जेव्हा 16 वं आणि 18 वं षटक बुमराहकडे सोपवलं होतं, तेव्हा त्याने इंग्लंडला दोन षटकात फक्त 14 धावा दिल्या. खऱ्या अर्थाने याच स्पेलने भारताला 7 धावांनी निसटता विजय मिळवून दिला. त्यामुळे कठीण काम करणाऱ्या बुमराहलाच खरा ‘मॅन ऑफ द मॅच’ द्यायला हवा होता, असा दावा इरफानने केलाय.
संजूच्या 42 चेंडूतील 89 धावांच्या वादळी खेळीचं इरफानने कौतुक नक्कीच केलंय. पण त्याचं स्पष्ट मत आहे की, खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असेल तर गोलंदाजाला बक्षीस मिळायला हवं. बुमराहसारखा हिरा भारताला मिळालाय, हे आपलं नशीब असल्याचंही तो शेवटी म्हणाला. सध्याच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बुमराहने फक्त 6.62 च्या इकॉनॉमीने 10 विकेट्स खिशात घातल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ T20 WC : फायनलआधीच ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा गौप्यस्फोट; भारताच्या विजयात ‘तो’ टाकणार मिठाचा खडा?
- Bigg Boss Marathi 6: घरात ‘भूल भुलैय्या’चा थरार; राखी सावंत बनली ‘मंजुलिका’, नव्या प्रोमोने उडवली खळबळ!
- Maharashtra Budget 2026: अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार… बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










