मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलै रोजी महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी केला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. याव्यतिरिक्त, मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेल्या विविध चक्रीवादळी प्रणालींमुळे (cyclonic systems) मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. या हवामान प्रणालींमुळे मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला असून राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत जोरदार पावसासाठी ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला होता. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नंतर ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. मुंबईत शनिवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, परंतु मंगळवारपासून सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी २२ जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ लागू असेल.
कोकणात ‘येलो अलर्ट’
या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढणार असले तरी, हवामान अभ्यासकांच्या मते, आगामी पावसाची तीव्रता जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसासारखी नसेल. त्यामुळे जुलै महिन्यात पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढला आहे. मंगळवारी रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात ताशी ५०-६० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी २१ जुलै रोजी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कुठे पाऊस पडेल?
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने डोंगराळ आणि घाट माथ्याच्या भागात मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातही घाट माथ्याच्या भागात पावसाचा जोर वाढणार असून तेथे ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असेल आणि हलक्या सरींची शक्यता आहे.
मराठवाड्यातील परिस्थिती कशी असेल?
मंगळवारी मराठवाड्यात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात किती पाऊस पडेल?
हवामान विभागाने नाशिकच्या घाट माथ्यावरील भागासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तेथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर इतर ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडू शकतात. दरम्यान, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. या तीन जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
विदर्भातील हवामान कोरडे
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असला तरी, विदर्भात मात्र पावसाने दडी मारली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपला’; दिल्लीतील लाठीचार्जवर सुप्रिया सुळेंचा संताप
- संसद मोर्च्यानंतरही CJP आक्रमक; ‘आंदोलन थांबणार नाही’, अभिजित दिपकेंची घोषणा
- धर्मेंद्र प्रधान–अमित शाह यांची 3 तास बैठक; CJP आंदोलनावर मोठी रणनीती?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












