Shivsena | “शिवसेनेला संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं”; शिंदे गटाची बोचरी टीका

Shivsena | मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना आरोप प्रत्यारोपाची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

“संजय राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली हे आम्हाला नेहमीच वाटतं”, असं म्हणत केसरकरांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल केलाय.

“संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेलंय. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधललाय”, असा दावाही दीपक केसरकर यांनी केला. “राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा,” असं आव्हानही दीपक केसरकर यांनी राऊतांना दिलं आहे.

पुढे ते म्हणाले, “विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती मतदान झाले हे पाहिलं जातं. आमच्यासोबत ऐंशी ते नव्वद टक्के आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. आमचाच विजय होईल.”

महत्वाच्या बातम्या :

Back to top button