KASBA | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र

BJP | पुणे : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची आग्रही भूमिका होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पोटनिवडणुकीसाठीची तयारी सुरू करणाऱ्या भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राजकीय पक्षांना पत्र दिले आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधकांना तसे पत्र दिले आहे. भाजपच्या या आवाहन पत्रावर आता विरोधकांकडून काय भूमिका घेणार,  प्रतिसाद देणार की, विनंती फेटाळत भाजपला आव्हान देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच भाजप मुक्ता टिळक यांच्या घरातील एका सदस्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कसबा मतदारसंघाकडून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या